जालना – भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे त्यांच्या ‘हटके’ वागण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. जालना मतदारसंघात खासदार दानवे कधी कोणाला काय म्हणतील आणि काय करतील याचा काही नेम नाही. रविवारी रावसाहेब दानवेंनी जाफ्राबाद येथील एका गावात घोड्यावरुन रपेट मारली. यावेळी त्यांचे चिरंजीव आणि भोकरदनचे आमदार संतोष दानवेही त्यांच्यासोबत दुसऱ्या घोड्यावर होते. दानवे पिता-पुत्रांची घोडेस्वारी पाहाण्यासाठी अख्खा गाव लोटला होता.
काय होते निमित्त
जाफ्राबाद तालुक्यातील आडा या गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार होणाऱ्या रस्त्याचे खासदार दानवे यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर दानवे पिता-पुत्रांची गावकऱ्यांनी वाजतगाजत घोड्यावरुन मिरवणूक काढली. दानवेंच्या गळ्यात फुलांचा हार आणि ते घोड्यावर स्वार होऊन गावात रपेट मारत असल्याचे पाहाण्यासाठी सर्व गावकरी गोळा झाले होते.
घोडेस्वारीनंतर शेतकऱ्याच्या घरी भोजन
खासदार दानवे यांनी रस्त्याचे भूमिपूजन आणि घोड्यावर बसून मिरवणूक झाल्यानंतर शेतकऱ्याच्या घरी भोजन केले. खाली संतरंजीवर बसून भाजी आणि भाकरी असा शेतकऱ्याच्या घरातील साध्या जेवणाचा खासदार दानवे यांनी आस्वाद घेतला.
याआधी व्हायरल झाला होता व्हिडिओ
खासदार दानवे यांचा घोड्यावर स्वार झालेला व्हिडिओ याआधीही व्हायरल झाला होता. त्यावरुन काँग्रेसने मोठी टिका केली होती. हा व्हिडिओ दानवे भाजप प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीचा होता की नंतरचा हे कळू शकले नव्हते, मात्र यावरुन विरोधीपक्षाने त्यांच्यावर टिकेची संधी सोडली नव्हती. आता दानवे पिता-पुत्र घोड्यावरुन रपेट मारत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.